डोलवी एमआयडीसी विरोधात शेतकरी एकवटले

मोजणी अधिकार्‍यांना पिटाळून लावले
। गडब । वार्ताहर ।
डोलवी एमआयडीसी प्रकल्पासाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकार्‍याना येथील शेतकर्‍यानी सामूहिक विरोध करीत मोजणी करण्यास मज्जाव केला. यावेळी बहुसंख्य शेतकरी व महिला उपस्थित होत्या.
पेण तालुक्यातील वडखळ, डोलवी विभागात जवळपास तेरा गावांमधे डोलवी एमआयडीसी प्रकल्प प्रस्थापित होत आहे. मात्र या प्रकल्पाबाबत शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा शेतकर्‍यांच्या जमिनी घेताना त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत याची कल्पना न दिल्याने शासन आमची दिशाभूल करून आमच्या जमिनी हडप करत असल्याचा आरोप करत शासनाकडून होणार्‍या मोजण्यांना विरोध करून आम्ही आमच्या जमिनी मोजून देणार नाही अशी भूमिका येथील शेतक-यांनी घेतली व ग ज्या कोणी आमच्या शेतकर्‍यांच्या जमिनी विकत घेण्यासाठीचे खोटे संमतीपत्र तयार करून खोट्या सह्या केल्या आहेत त्यांच्यावर सर्वप्रथम गुन्हे दाखल करा अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी केली आहे. तर यावेळी आमदार रवि पाटील यांनी उपस्थित शेतकर्‍यांची भेट घेऊन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याशी संपर्क साधला आणि सदर मोजण्या करण्यापूर्वी शेतकरी आणि प्रशासन यांची येत्या सोमवारी बैठक लावण्याची विनंती केल्यानंतर त्यांची ती विनंती मान्य करण्यात आली.
यापूर्वी सेझ नावाचा प्रकल्प येऊ घातला होता. त्यावेळी देखील शेतकर्‍यांनी एकजूट दाखऊन हा प्रकल्प हद्दपार करून दाखवला होता. त्याचीच पुनरावृत्ती म्हणून एमआयडीसी या प्रकल्पाला देखील विरोध दर्शऊन होणारी मोजणी होऊ दिली नाही.

Exit mobile version