दसर्‍याला भात कापणीसाठी शेतकरी सज्ज

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यात यंदाच्या वर्षी भात पिकाचे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले असले तरी यंदाचे वर्षी दरवर्षीच्या तुलनेत या भात पिकाला पोषक पाऊस, हवामान व वातावरण मिळाल्यामुळे यंदाचे वर्षी माणगाव तालुक्यात भात पिक उत्तम आले आहे. शेतकर्‍याची मेहनत आणि निसर्गाने दिलेली साथ यामुळे शिवारातील शेती चांगलीच फुलली आहे. अनेक ठिकाणी खडकाळ, वरकस जमिनीवरील हळवे पिक तयार झाले आहे ते पिक दसर्‍यात शेतकरी काढण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍याच्या उत्साहात भर पडली आहे. माणगावात यंदाचे वर्षी शेतकर्‍यांनी 11281 हेक्टरवर भात लागवड केली होती. यंदाचे वर्षी एका हेक्टरला 1753 किलो भाताचे उत्पादन मिळेल अशी अशा वाटत आहे. त्यामुळे यंदाचे वर्षी 11281 वर सरासरी 360992 क्विंटल उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे माणगावला भाताचे कोठार अशी ओळख कायम राहणार आहे.
माणगाव तालुक्यात सरासरी पर्जन्यमान 3378 मी.मी. आहे मागील वर्षाचा पाऊस 3048 मिमी. पडला होता. यंदाच्या वर्षीचा पाऊस आजपर्यत 2872.50 मिमी पडला आहे. गेल्या वर्षी भात लागवडीचे क्षेत्र 13314 हेक्टर होते तर चालू वर्षी खालील भात क्षेत्र 11281.62 हेक्टर होते. यंदाच्या वर्षी पारंपारिक व भात पिकाच्या वाणाची लागवड शेतकर्‍यांनी केली आहे. हे पिक आता पूर्ण तयार झाले असून काही ठिकाणी हळव्या भात पिकाच्या कापणीची लगबग सुरु झाली आहे. यंदाच्या वर्षी शेतकर्‍यांना विक्रमी उत्पादन मिळणार असल्याने त्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

Exit mobile version