हिंद टर्मिनलमुळे शेतकऱ्यांचे रस्ते बंद

मार्ग खुले करण्याची मागणी

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील चिरनेर-कळंबुसरे हद्दीत उभारण्यात आलेल्या हिंद टर्मिनलमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे शेतावर जाण्याचे पारंपरिक मार्ग बंद झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीने उभारलेल्या संरक्षण भिंतीमुळे शेतात ये-जा करण्यास अडथळे निर्माण झाले असून, शेतीकामे ठप्प होण्याची वेळ आली आहे.

याशिवाय, कंपनीने संपादित केलेल्या जमिनीत टाकलेल्या भरावामुळे पाण्याच्या नैसर्गिक निचऱ्याचे मार्ग बंद झाले आहेत. परिणामी भात शेतीतील पाणी योग्यरीत्या न निघाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात कळंबुसरे येथील शेतकरी अक्षय लक्ष्मण केणी यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी 20 मे 2025 रोजी उरण तहसीलदारांकडे निवेदन सादर केले होते. तहसीलदारांनी जुन्या वहिवाटीचे मार्ग पूर्ववत सुरू करण्याचे आदेश देऊनही कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उरण तालुका कृषीप्रधान असून भात हे येथील प्रमुख पीक आहे. मात्र, ट्रॅक्टर, पावर टिलर यांसारखी यंत्रसामग्री शेतात नेण्यासाठी रस्ता नसल्याने मशागतीची कामे करणे कठीण झाले आहे. शासनाच्या नियमांनुसार शेतापर्यंत रस्ता ठेवणे बंधनकारक असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, चिरनेर व कळंबुसरे येथील 37 शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या असून, अजूनही काही शेतजमिनी शेतीखाली आहेत. मात्र, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कंपनीने तातडीने संरक्षण भिंत हटवून शेतकऱ्यांचे मार्ग मोकळे करावेत, अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.

आमच्या शेतावर जाण्यासाठीचा जुना रस्ता बंद झाल्याने शेती करणेच कठीण झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मार्ग मोकळा करून द्यावा.

अक्षय केणी,
शेतकरी, कळंबुसरे
Exit mobile version