शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी पूर्ण करावी

तालुका कृषी अधिकार्‍यांचे आवाहन

| तळा | प्रतिनिधी |

तळा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपली ई पीक पाहणी पूर्ण करून फळ पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तळा तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी शेतकर्‍यांना केले आहे.

शासनाने शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी पीक विमाबाबत नवीन धोरण अवलंबले आहे. त्यानुसार शेतकर्‍यांसाठी शासनाने कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या कंपन्या विम्यासाठी निश्‍चित केल्या आहेत. त्या कंपन्यांच्या माध्यमातून फळ पीक विमा योजना राबविण्यात येत असल्याने शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना 12 जून, 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत मृग बहार सन 2024 मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष (क), चिकू, पेरू, सिताफळ व लिंबू या 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये, तर आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकर्‍यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे, परंतु फळपिकांची ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाईल अ‍ॅपद्वारे केलेली नाही, त्यांनी 25 एप्रिल, 2025 पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी, अन्यथा 7/12 उतार्‍यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील असे आवाहन तळा तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version