| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाची मध्यवर्ती समितीची बैठक मुंबई येथील कार्यालयात रविवारी झाली. या बैठकीत गारपीटग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मराठ्यांना द्यावे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून ठराव करण्यात आला. त्याला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.
शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी प्रा. एस. व्ही. जाधव, कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, माजी आमदार पंडित पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रामदास जराते, उमाकांत राठोड, बाबासाहेब कारंडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, बाबासाहेब देवकर, भारत पाटील, ॲड. मनीष बस्ते, पी.डी. गायधणी, ॲड. सुभाष पाटील, बाबुराव लगारे, सचिन मुकणे, प्रसाद साळवी, राहूल देशमुख, प्रा. शैलेंद्र मेहता, कांबळे आदी रायगड, ठाणे, सोलापूर, सांगोला, औरंगाबाद, कोल्हापूर, गडचिरोली, सांगली, पालघर जिल्ह्यातील शेकापचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पक्ष संघटना बळकट करणे, पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे, मोर्चेबांधणी करण गाव पातळीवर काम करताना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणे अशा वेगवेगळ्या विषयांवर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली.
इंडिया आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला स्थान मिळाले आहे. इंडिया आघाडी म्हणून रायगड जिल्ह्यात काम करण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी म्हणून मित्र पक्षांना सोबत घेऊन काम केले. राज्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकांमध्येदेखील शेकापला सामावून घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली. राज्यात सध्या मराठा आरक्षणबाबतचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. मराठयांना आरक्षण मिळाले पाहिजे ही शेकापची भूमिका कायमच आहे.
राज्यात अवकाळी पावसासह दुष्काळ, गारपीटमुळे भातशेती, व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी बेजार झाला आहे. या शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी आणि त्यांना उभारी देण्यासाठी तातडीने सरकारने नुकसानीचे पंचनामे करून त्यांना भरपाई द्यावी असा ठराव घेेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयावर शेकाप मार्फत निर्दशने व मोर्चे तसेच निवेदने देण्यात यावीत असा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी आ. पंडित पाटील यांनी सांगितले,पक्षाचा स्वतंत्र निधी असणे आवश्यक आहे.निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे असे आवाहन यावेेळी करीत पाच लाख रुपये पक्षासाठी देण्याचे त्यांनी जाहिर केले.
निवडणुक आयोगाच्या नियमांनुसार पक्ष संघटनाचे काम होणे गरजेचे आहे. त्या पध्दतीने पक्षाची बांधणी करून सभासद नोंदणीदेखील करावी लागेल असे यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे म्हणाले.






