शेतकर्‍यांनी स्वत:ची विक्री व्यवस्था उभी करावी- सुरज पाटील

। पोलादपूर । वार्ताहर ।

पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नैसर्गिक शेतीला चांगला भाव मिळत असल्याने सलग 3 वर्षे नैसर्गिक शेतीविषयी कृषी विभाग शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून आपल्या शेतीचे सर्टिफिकेशन करणार आहे. अशा प्रमाणित शेतमालाचे उत्कृष्ट पॅकिंग व ब्रँण्डिंग केल्यास त्यास जागतिक बाजरपेठेत चांगला भाव मिळून शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेती व प्रक्रिया उद्योग करून स्वत:ची विक्री व्यवस्था उभी करावी, हाच शेतीसाठी फायदेशीर उपाय असल्याचे मत तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी व्यक्त केली.

पोलादपूर तालुक्यातील पैठण येथे मंडळ कृषी कार्यालयाच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन 2023-24 अंतर्गत तालुकास्तरीय दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील, प्रमुख मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्र सेंद्रियशेती तज्ञ जीवन आरेकर, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी पर्यवेक्षक रविंद्र गुंड, शेतकरी प्रोडयुसर कंपनी प्रमोद चव्हाण, आत्मा प्रकल्पाचे कपिल पाटील, कृषी सहाय्यक मनोज जाधव, चेतन लावंड, पुनम क्षीरसागर, मोनिका पिसाळ, संग्राम साळुंखे तसेच स्थानिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्र रोहा शास्त्रज्ञ जीवन आरेकर यांनी नैसर्गिक शेती योजनेतील राबवावयाच्या विविध घटकांची माहिती देताना, सेंद्रिय खते, कीडनाशके तयार करणे, उदा. दशपर्णीअर्क, निमास्र, जीवामृत, रक्षक सापळेबाबत माहिती, नैसर्गिक शेतमाल शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, शेतकरी प्रशिक्षण, निविष्ठा उत्पादन व जमिनीचे प्रमाणिकरण व विक्री व्यवस्था निर्माण करणे या विषयी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

पैठण मंडळ अधिनस्त 11 शेतकरी गटांना आत्मा नोंदणी प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, आभार प्रदर्शन रवींद्र गुंड तर, सुत्रसंचलन कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अध्यक्ष व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Exit mobile version