सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कला भूमिपुत्रांचा तीव्र विरोध

लॉजिस्टिक पार्कला जमीन न देण्याचा शेतकर्‍यांचा निर्धार
। उरण । प्रतिनिधी ।
सिडकोने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील बेलोंडेखार परिसरातील आठ गावातील 750 एकर जमिनी लॉजिस्टिक् पार्कसाठी शेतकर्‍यांचा विरोध असताना एमआरटीपी कायद्यानुसार अधिसूचित केल्या आहेत.

या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांनी सहमती द्यावी, यासाठी सिडकोने एकतर्फी शेतकर्‍यांना नोटिसा बजावल्या. त्याच बरोबर कोणताही करार न करता सूनावण्या ठेवल्या. या प्रकल्पात सहभागी होणार्‍या भूमिपुत्रांना कोणताही भरीव आर्थिक मोबदला मिळणार नाही. तसेच या याजनेत सहभागी होणार्‍या भूमिपुत्रांना न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही. कोणताही रोजगाराचा हक्क सांगता येणार नाही, असा जाचक करारनामा नितिभ्रष्ट सिडकोसोबत करावा लागणार आहे.


भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या अधिकारावर बेकायदेशीररित्या गदा आणण्याचा प्रयत्न सिडको मार्फत करण्यात येत आहे. सिडकोच्या लॉजिस्टिक पार्कमुळे येथील भूमिपुत्रांना गावाचा त्याग करावा लागणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित भूमिपुत्रांची आज जी अवस्था झाली आहे, तशी या आठ गावातील बांधवांची होणार असल्याने या प्रकल्पास तीव्र विरोध होत आहे.

हा प्रकल्प कर्नाळा पक्षी अभयारण्य प्रकल्पाच्या बाधित भागात येत असून प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा र्‍हास होऊन समतोल बिघडणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक ती केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. रविवारी (दि.4) या प्रकल्पास हद्दपार करण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी जांभूळपाडा येथे कोव्हिड नियमांचे पालन करून अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सिडको मार्फत राबविण्यात येणार्‍या या प्रकल्पास जमीन न देण्याची एकमुखी घोषणा अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांनी उपस्थित भूमिपुत्रांसमोर जाहिररित्या मांडली असून सर्वांनी त्यास संमती दिली आहे. या प्रकल्पा विरोधात लवकरच जाहिर आंदोलन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांनी केली. सिडकोस हा प्रकल्प अत्यावशक असल्यास त्यांनी शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी न घेता रिलायन्स सेझसाठी संपादित व वीस वर्षे पडीक असलेली जमीन ताब्यात घ्यावी, अशी मागणी सुधाकर पाटील यांनी केली.

या सभेस उपस्थित संतोष पवार, संजय ठाकूर, रमाकांत पाटील. गुरुनाथ पाटील, रमन कासकर, रुपेश पाटील, राज पाटील,रा बा म्हात्रे,पी सी मढवी, प्रा. राजेंद्र मढवी, ड मनोज म्हात्रे, सरपंच मुंबईकर,पंकज ठाकूर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

Exit mobile version