कालव्याला पाणी न सोडल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान
। कोलाड । वार्ताहर ।
कोलाड पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. परंतु, अद्याप ही कामे पूर्ण झाली नाही. याउलट काही ठिकाणी सुरु असणारे कालव्याचे पाणी यावर्षी बंद करून येथील शेकडो शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल शेतकरीवर्गातून व्यक्त केला जात आहे.
कुंडलिका सिंचनातून उजव्या तीरातून पुई गोवे गावाच्या भातशेतीला पाणीपुरवठा केला जातो. परंतु, मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात महामार्गावरून जाणारा पाणीपुरवठा करणारा चेंबर ठेकेदाराच्या मनमानीनुसार तोडून टाकला, तो पुन्हा बांधून पाणीपुरवठा सुरळीत सरू करावा, यासाठी गोवे व पुई ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. यानंतर पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांनी सदर ठिकाणी भेट दिली. नवीन बांधकाम लवकर करून पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले होते.
15 वर्षांपूर्वी रोहा तालुक्यातील सर्व परिसर सुजलाम् सुफलाम् होता. परंतु, कोलाड पाटबंधारे खात्याकडून डावा व उजव्या तीराच्या कालव्याच्या दुरुस्तीची करोडो रुपयांची कामे गेली चार-पाच वर्षांपासून सुरु आहेत, ती अद्यापही पूर्ण झाली नाहीत. यामुळे संपूर्ण रोहा तालुक्यातील भातशेतीला पाणी नाही. यामुळे या परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे काही ठिकाणी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर, गुरेढोरे यांनाही पाणी मिळत नाही. यामुळे कालवा दुरुस्तीची कामे लवकरच लवकर पूर्ण करून कालव्याला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी येथील शेतकर्यांकडून केली जात आहे. तरी, संबंधित विभागाने यावर तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.