कंपनी स्थापनेसाठी एकवटले शेतकरी

| तळा | वार्ताहर |

सेंद्रिय शेती करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत नैसर्गिक शेती योजनेच्या माध्यमातून तळा तालुक्यातील कुडे, रोवळा, खांबवली, कुंभळे, वरळ, वाशी हवेली, मझगाव, गणेशनगर या गावातील 10 शेतकरी गटांनी नोंदणी प्रस्ताव आत्मा कार्यालयाकडे सादर केला आहे, तर याच शेतकरी उत्पादक गटांच्या माध्यमातून 500 शेतकर्‍यांनी ऑर्गेनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही तालुक्यातून पहिली सेंद्रिय शेती उत्पादक कंपनी स्थापन करण्याविषयी एकवटले आहेत.

या शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथून सनदी लेखापाल नितीन सोनवणे व श्रीनिवास चत्तर हे उपस्थित होते. सुरवातीस सनदी लेखापाल नितीन सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना आज शेतकर्‍यांनी संघटित होऊन एकमेकांच्या सहकार्यातूनच शेतमाल उत्पादन, त्याचबरोबर विक्री, बाजारपेठ हस्तगत करणे गरजेचे झाले आहे. त्या दृष्टीने तालुक्यातून शेतकर्‍यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे गरजेचे आहे, यासाठी शासन आपल्या सोबत असल्याचे सांगितले व शेतकरी उत्पादक कंपनीसाठी असलेल्या योजना विषयी विस्तृत माहिती सांगितली. यानंतर श्रीनिवास चत्तर यांनी कंपनी स्थापन करताना कागदपत्रे अध्यक्ष व संचालक निवड व त्यांचे कर्तव्य जबाबदार्‍या, कंपनीस नाव देणे, कंपनीचे लेखा परीक्षण याविषयी माहिती दिली व शंकाचे निराकरण केले. या कार्यक्रमास पंचायत समिती माजी उपसभापती गणेश वाघमारे, मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव, सनदी लेखापाल नितीन सोनवणे व श्रीनिवास चत्तर, कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे, आत्मा बीटीएम सचिन लोखंडे व गटांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.

Exit mobile version