शेतकऱ्याला हवा महिन्याला दहा हजार पगार

जरांगेंच्या सरकारकडे 8 मोठ्या मागण्या

| बीड | प्रतिनिधी |

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची बीडच्या नारायणगड येथे सभा पार पडली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील हे आजारी असूनही उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलंच, पण यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर देखील जास्त भाष्य केलं.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या भयानक परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची अशा आहे. या काळात शेतकऱ्यांना काय-काय मदत करावी, याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्या केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे 8 मोठ्या मागण्या केल्या आहेत. सरकारने येत्या महिन्याभरात दिवाळीपर्यंत हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू केलं नाही तर जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करु नका. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकारने जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत. आम्ही बॅलेट आमच्या गावात लावू देणार नाही. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय, शंभर टक्के नुकसान भरपाई दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करु देणार नाही आणि तुम्ही केलीत तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ देणार नाहीत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मागण्या दिवाळीपर्यंत पूर्ण केल्या नाहीत तर आपण सर्व शेतकऱ्यांना धाराशिव किंवा बीड जिल्ह्याच्या सीमेवर बोलवू किंवा जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणामध्ये बैठकीला बोलवू. किती तारखेला आंदोलन सुरु करायची ते ठरवू. आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरु करु. शेतकऱ्यांना न्याय देईपर्यंत मागे हटायचं नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

अशा आहेत 8 मागण्या
ओला दुष्काळ जाहीर करा.
70 हजार रुपये हेक्टरी द्या.
नदीच्या कडेच्या शेतकऱ्यांना 1 लाख 30 हजार मदत द्या.
संपूर्ण कर्जमुक्ती करा.
आत्महत्या केली तर शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी द्या.
शेतकऱ्याला हमीभाव द्या.
शेतीला नोकरीचा दर्जा द्या.
शेतकऱ्याला पीकविमा द्या.
Exit mobile version