| उरण | वार्ताहर |
सिडकोने आरपीझेडसाठी चाणजे, रानवड, नागाव ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नव्याने जमिनी संपादित करण्याच्या आवाहनाला बुधवारी (19) उशिरा आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नागरिकांनी जोरदारपणे विरोध केला. वारंवार फसवणूक करणार्या सिडकोला यापुढे एक इंचही जमीन संपादन करुन न देता हरकती नोंदविण्यासाठी मोठ्या संख्येने सिडको भवनावर धडक देऊन सिडकोचे मनसुबे उधळून लावण्याचा निर्णयही नागरिकांनी या बैठकीत जाहीर केला आहे.
सिडकोने उरण तालुक्यातील चाणजे, रानवड, नागाव, केगाव आदी ग्रामपंचायतीच्या महसुली गावातील जमिनी संपादित करण्यासाठी अधिसूचना 12 ऑक्टोंबर रोजी वर्तमान पत्रातून जाहीर केली आहे. या जमिनीवर येथील शेतकर्यांची हजारो निवासी घरे आहेत. आरपीझेडसाठी संपादन करण्यात येणार असल्याने येथील हजारो घरे व शेतकरी यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिडकोने जाहीर केलेल्या आरपीझेडसाठी जमिनी द्याव्यात की देऊ नयेत याबाबत नागरिकांना माहिती देऊन ठोस निर्णय घेण्यासाठी बुधवारी (19) संध्याकाळी म्हातवली, नागाव, केगाव ग्रामपंचायतींच्या माध्यमातून संबंधित परिसरातील रहिवाशांची बैठक बोलावण्यात आली होती. केगाव सरपंच चिंतामण पाटील, म्हातवली सरपंच रंजना पाटील, नागाव सरपंच चेतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी रामचंद्र म्हात्रे, भूषण पाटील, संजय ठाकूर, अॅड. दीपक पाटील, अॅड. सागर कडू, जगदीश तांडेल आणि तीनही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिडकोने या आधीच या परिसरातील शेतकर्यांची शेकडो एकर जमीन संपादन केली आहे.त्यानंतर सिडकोने शेतकर्यांकडून कवडीमोल भावाने घेतलेल्या हजारो हेक्टर जमिनी नवीमुंबई सेझ प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली रिलायन्स सारख्या बड्या भांडवलदारांच्या घशात घालून प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूकच केली आहे. यासाठी 27 ऑक्टोबर रोजी सिडकोविरोधात सिडकोच्या प्रशासन भवनात हरकती आणि हल्लाबोल करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच यासाठी गावोगावी फिरून शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी अनेकांनी सिडकोच्या कृतीचा निषेध करुन कायदेशीर व जनशक्तीच्या माध्यमातून चळवळ उभारुन आंदोलन छेडण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत.