क्षात्रैक्य कृषक महोत्सवातून करणार शेतकर्‍यांचे प्रबोधन

6 ते 9 जानेवारी दरम्यान महोत्सवाचे आयोजन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपली जमीन विकू नये, त्यामधे वेगवेगळे प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवावे याकरिता क्षात्रैक्य समाज अलिबाग यांच्यावतीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मार्गदर्शक होऊ शकेल, असे एक भव्य राज्यस्तरीय शेती प्रदर्शन म्हणजेच क्षात्रैक्य कृषक महोत्सव आवास येथे आयोजित केला असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रदीप नाईक यांनी दिली. या कृषक महोत्सवमधून शेतकर्‍यांच्या प्रबोधन करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे, असे प्रदीप नाईक यांनी विशेष नमूद केले.

यावेळी कृषक महोत्सवाचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, रमेश नाईक, अ‍ॅड. विलास नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, क्षात्रेक्य समाज अध्यक्ष अविनाश राऊळ, श्रीनाथ कवळे, मनोज राऊळ, रवींद्र वर्तक आदी उपस्थित होते.

सदर कृषक महोत्सव मोठ्या प्रमाणात होणार असल्याने ग्रुप ग्रामपंचायत सरपंच आवास आणि क्षात्रैक्य समाज अलिबाग संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत प्रभाकर राणे यांनी पुढाकार घेऊन ग्रुप ग्रामपंचायत आवासने प्रमुख प्रायोजकत्व स्वीकारल्याचे जाहीर केले आहे, तसेच आरसीएफ कंपनीने सहप्रायोजकत्व स्वीकारून हा क्षात्रैक्य कृषक महोत्सव 6 ते 9 जानेवारी या कालावधीत पार पडत आहे. यासाठी बोर्डी, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड मधील नांदगाव, मुरुड, श्रीवर्धन, रोहा, पेण, दिवेआगर, हरेश्‍वर, पनवेल आणि रत्नागिरी मधील केळशी, वेळास या ठिकाणच्या क्षात्रैक्य समाजाशी संबंधित संघटनानी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. असे प्रदीप नाईक यांनी सांगितले.

या महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या शेतीमालाचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी जवळजवळ 100 स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांसाठी कमीतकमी जागेत, कमीतकमी पाण्याचा वापर करून जास्तीतजास्त उत्पन्न देणारी पिके, विविध बँकांच्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना यांच्या माहिती संबंधित आणि शेतमालावर आधारित उद्योग शेती परिणाम विषयी मार्गदर्शन करणारे चर्चासत्र आयोजित केली जाणार आहेत. या कृषक महोत्सवामध्ये महिला बचत गट आणि राज्यातील नामांकित कंपन्यांचे स्टॉल, कृषी संबंधित वस्तू यांचे स्टॉल्स आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. असे प्रदीप नाईक यांनी सांगितले.

या महोत्सवामध्ये शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरतील अश्या प्रमुख विषयांवर 5 चर्चासत्रे आयोजित केली असून यामध्ये कोकण कृषी विद्यापिठाचे मान्यवर तज्ञ अधिकारी, केळवा, बोर्डी येथील प्रगतशील शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये शेती पर्यटन, शेती प्रक्रीया उद्योग, सेंद्रिय शेती, शेतीतील उत्पादकता वाढ व अपारंपारीक शेती असे विषय चर्चिले जाणार आहेत.

या राज्यस्तरीय महोत्सवाचे औचित्य साधून शेतकर्‍यांना अधिक आनंद देण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत आवास आणि ग्रामस्थ मंडळ आवास यांच्या माध्यमातून चार दिवसात राज्यस्तरीय कबड्डी, कुस्ती, शरीरसौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी 6 जानेवारी रोजी रात्रौ 8 ते 10 वाजेपर्यंत नंदेश उमप संगीत रजनी हा कार्यक्रम आणि सायली शिंत्रे तळवळकर यांच्या सुगमगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

महोत्सवाची सुरुवात आवास सासवणे धोकवडे रहिवासी संघाचे अध्यक्ष रणजीत राणे यांच्या हस्ते गणेश पूजन व श्रीफळ वाढवून कृषी दिंडीने होणार आहे. त्याचप्रमाणे आपला आध्यात्मिक वारसा जपण्याच्या दृष्टिकोनातून भजनांचाही समावेश असणार आहे. आवास व परिसरातील शालेय विद्यार्थी, वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन ( पोलीस खाते व शिक्षण खाते अंतर्गत), आवास ग्रामस्थ, क्षात्रैक्य समाज कार्यकर्ते, उपस्थित शेतकरी, हरेकृष्ण संघ अलिबाग यांचा सहभाग असणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन 6 जानेेवारी रोजी सकाळी 10 वा. सहकारमंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते व आमदार जयंत पाटील, आमदार मनिषा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. महोत्सवाची सांगता 9 जाने. रोजी सायंकाळी 5 वा. खासदार सुनिल तटकरे, स्थानिक आमदार, आमदार अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, असे प्रदीप नाईक यांनी सांगितले.

सदर महोत्सवामध्ये राज्यातील शेतकर्‍यांना शेतीविषयक उपयुक्त ठरेल अशी माहिती देणारी आणि क्षात्रैक्य समाज संस्थेच्या कार्याविषयी माहिती देणारी, सर्वांच्या संग्रही राहील अशी स्मरणिका प्रकाशित केली जाणार असून त्यासाठी विविध शेती तज्ञांचे लेख प्रकाशित करण्यात येणार आहेत.

Exit mobile version