शेतकर्‍यांचा आसूड कडाडणार

29 ऑगस्टला ‘ट्रॅक्टर मार्च’ची हाक!
| नाशिक | वृत्तसंस्था |
कृषी कायदे रद्द करण्यासाठी नवी दिल्लीत शेतकर्‍यांनी गेल्या नऊ महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या शेतकर्‍यांनी दंड थोपाटले आहेत. नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीने येत्या 29 ऑगस्ट रोजी जिल्हाव्यापी ट्रॅक्टर मार्चची हाक दिली आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच हा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीची नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नुकतीच बैठक झाली. या बैठकीला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, निफाडचे आमदार दिलीप बनकर, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप, नगरसेवक सुधाकर बडगुजर, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच माकप व भाकपचे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून हजारो ट्रॅक्टर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला 500 पेक्षा जास्त शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या नऊ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या लाखो शेतकर्‍यांच्या पाठिंब्यांकरिता व मोदी सरकारच्या निषेधार्थ 29 ऑगस्टच्या ट्रॅक्टर मोर्चात हजारो ट्रॅक्टर घेऊन सामील व्हा, असे आवाहन सर्व नेत्यांनी यावेळी केले. या बैठकीचे अध्यक्षस्थानी अशोक खालकर होते. याप्रसंगी अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बहुजन शेतकरी संघटना, काँग्रेस किसान सेल, राष्ट्र सेवा दल वगैरे संघटनांचे अनेक शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version