। ठाणे । वर्ताहर ।
ठाणे जिल्ह्यातील शेतकर्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ जलदगतीने व परिणामकारकरित्या पोहोचवता यावा यासाठी कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजीटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रिस्टॅक ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे प्रत्यक्ष काम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत.
केंद्र शासनाने अॅग्रिस्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अॅग्रिस्टॅक हे कृषि क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकर्यांपर्यंत जलदगतीने व परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी मदत होणार आहे. अॅग्रीस्टॅक संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी गट विकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांचे नियोजन व कामकाजाकडे नियंत्रण असणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी एम.एम. बाचोटीकर यांनी दिली. तसेच, सर्व ग्रामपंचायतींमार्फत कॅम्प नियोजन करण्यात येणार असून शेतकर्यांना फार्मर आयडी तयार करून देण्यात येणार आहेत.