| मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर सातत्याने घसरत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर सरकारने कांद्याला किमान 1,000 रुपये प्रतिक्विंटल अनुदान दिले नाही आणि येत्या काळात कांद्याचे बाजारभाव किमान 3,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे. या आंदोलनात रास्ता रोको आणि रेल रोकोचा समावेश असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी प्रती क्विंटल सुमारे 2,500 खर्च येतो, मात्र बाजारपेठेत मिळणारे दर त्याहून खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटल सुमारे 1,500 चा तोटा सहन करावा लागत आहे. या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, असेही भारत दिघोळे म्हणाले.







