गटनिहाय संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
शासनाच्या शेतीविषयक धोरणाचा आढावा घेऊन शेतीचे होणारे नुकसान कसे टाळता येईल, याबाबत शेतकर्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. यासाठी 1 ऑगस्टपासून जिल्हा परिषद गटनिहाय समृद्ध कोकण अभियान संस्था आणि रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघ, रत्नागिरीतील शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे, असे प्रकाश साळवी यांनी सांगितले.
राज्य शासन विकासाच्या सर्वच स्तरावर कोकणाला खड्यासारखे बाजूला ठेवत आलेले आहे. पर्यटन विकास आणि रोजगार निर्मिती करणे शक्य असतानाही केंद्र शासन आणि राज्य शासनाने कोकणात प्रदूषण निर्माण करणारे कारखाने देण्याच्या नावाखाली कोकणातील शेती आणि शेतकरी दोघांनाही संपवण्याचा चंगच बांधला आहे. येथील शेतकर्यांचे प्रतिकूल नैसर्गिक वातावरणामुळे मोठ्या मेहनतीने निर्माण केलेले शेती पिक ऐन काढणीवेळी वादळवारे आणि पाऊस यामुळे मातीमोल होत आहेत. सरकार आणि राजकारणी सर्वेशिवाय शेतकर्यांच्या पदरात काहीच पडू देत नाहीत. कर्जमाफी, व्याजमाफीसारख्या योजना बँका आणि सरकारच्या कागदावरून शेतकर्यांच्या पासबुकपर्यंत सरकतच नाहीत. याचा अनुभव गेली अनेक वर्षे इथला शेतकरी घेत आहे.शेतकरी मेला तरी चालेल; परंतु शेतकर्यांपेक्षा इथली उपद्रवी माकडे जगावीत, अशी इथल्या राजकारण्यांची व शासनाची भूमिका आहे. इथला शेतकरी माकडे हाकलून मरतोय आणि त्यासाठी त्याला उत्पन्नाचा सुमारे 75 टक्के भाग खर्च करावा लागतो आहे. वातानुकूलित कार्यालयात बसून राजकारभार चालवणार्या नेत्यांना भान नाही.
यासह विविध प्रश्नांवर चर्चा करून शेतकरी एकजूट निर्माण करण्यासाठी सर्वपक्षीय, सर्व सामाजिक आणि शेतीविषयक कार्य करणार्या संघटनांची जिल्हा परिषद गटनिहाय बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्टला सकाळी 9 वा. शिवार आंबेरे येथून बैठकीला सुरवात होईल. त्यानंतर हरचिरी, पावस येथे बैठक होईल. 2 ऑगस्टला निवळी, करबुडे, खंडाळा आणि गणपतीपुळे अशा चार ठिकाणी बैठकांचे नियोजन केले आहे. 7 ला दुपारी 3 वा. रत्नागिरीतील विवेक हॉटेलच्या मैदानावर संयुक्त सभा होणार आहे, असे साळवी यांनी सांगितले.
विम्याचे हप्ते शेतकर्यांची अडचण
शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकार विविध कंपन्यांना विमा काढण्याची परवानगी देते. विम्याचे हप्ते हे शेतकर्यांना अडचणीचे आहेत. नुकसान झाल्यावर कधीही विम्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. या कंपन्याचे एजंट शेतकर्यांकडे विमा काढण्यासाठी येताना गोड गोड बोलतात; परंतु नुकसान होते आणि भरपाई द्यायची वेळ येते तेव्हा हात वर करतात, असे साळवी यांनी सांगितले.