विनय वेखंडे यांनी घेतले दीड टन उत्पादन; कृषी पर्यटन केंद्रासाठी उत्पादनाचा वापर
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे विनय वेखंडे यांनी आपल्या शेतात यावर्षी लाल कांद्याचे पीक घेतले आहे. फुरसुंगी जातीचा लाल कांद्याचे तब्बल दीड टन उत्पादन घेतले असून, त्यापैकी एक किलोदेखील हे शेतकरी विक्री करणार नाहीत.
कर्जत राजानाला कालवा परिसरातील वदप गावातील शेतकरी विनय मारुती वेखंडे हे प्रगत आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. कृषी पर्यटन केंद्र चालवणार्या वेखंडे यांना आपल्याकडे येणार्या पाहुण्याचे जेवण बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारातून खरेदी करावा लागतो. त्यामुळे दुबार पाण्याचे क्षेत्र असलेल्या या भागात वेखंडे यांनी कांद्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पुणे येथून फुरसुंगी जातीचा लाल कांद्याचे रोप खरेदी केले. साधारण आठ गुंठे क्षेत्रावर त्यांनी डिसेंबर महिन्यात कांद्याची रोपे यांची लागवड केली. प्रयोगशील शेतकरी विनय वेखंडे यांच्या शेतात सर्वत्र ठिबक सिंचन पद्धतीने पाणी शेतीला दिले जाते. त्यात ठिबक सिंचन यंत्रणेतून कांद्याच्या शेतीला खते आणि कीटकनाशक यांची फवारणी सुरू ठेवली. त्यानंतर मार्च महिन्याचे अखेरीस कांद्याच्या पाती सुकू लागल्याने कांद्याचे काढणी केली. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात कांद्याचे पीक घेण्यासाठी साधारण चार महिन्याचा कालावधी लागतो. या भागातील दुबार शेतीसाठी सोडलेले कालव्याचे पाणी हे चोहोबाजूंनी परिसर हिरवेगार करण्यासाठी मदतगार ठरत आहे. त्यात येथील हवामानदेखील थंडगार असल्याने निश्चित कालावधीचे आधी कांद्याचे पीक हाती आले आहे. कांद्याचे सर्व पीक लागवड केलेल्या वाफ्यातून काढून बाहेर माळरानावर ठेवले आहे. त्या कांद्याचे शेतीमधून साधारण दीड टन पीक उपलब्ध झाले असून हा सर्व कांदा शेतकरी विनय वेखंडे हे आपल्या घरी नेऊन साठवण करून ठेवत आहेत. वेखंडे यांच्या घरी कांदा साठवण करण्याची व्यवस्था असल्याने सर्व दीड टन कांदा साठवला जाणार आहे. त्याचवेळी कांद्याचे सर्व उत्पादन हे आपल्या कृषी पर्यटन केंद्रासाठी वापरात आणले जाणार आहे.