वर्षातून तीनदा बहणार शेती

विक्रमी उत्पादनासाठी बळीराजा सज्ज; माणगावातील शेतकर्‍याची प्रयोगशील शेती

| माणगाव | प्रतिनिधी |


निसर्गाच्या बदलत्या हवामानाचा फटका दरवर्षी शेतीला बसत असल्याने शेती करणे तोट्याचे ठरत आहे. असे असताना योग्य नियोजनातून एक, दोन नव्हे, तर वर्षातून तब्बल तीन वेळा भात लावणी करुन विक्रमी उत्पादन घेता येईल, असा प्रयोग माणगावातील विजय मेथा या शेतकर्‍याने केला आहे. उत्पादनाची शाश्‍वती नसल्याने अनेक शेतकरी आपली शेती ओसाड टाकून तिच्याकडे पाठ फिरवित असताना, मेथा यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

माणगावचे प्रसिद्ध उद्योजक तथा धनंजय राइस मिलचे मालक व शेतकरी विजयशेठ मेथा भातवाले यांनी तळेगाव येथील आपल्या दोन एकर भातशेती जमिनीवर भातपिकाची लागवड सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली असून, हे तीन महिन्यांत पीक तयार झाल्यानंतर पुन्हा याच जागेवर दुसरे तीन महिन्यांत तयार होणारे कर्जत 84 जातीचे हे पीक 84 दिवसांत घेतले जाणार आहे. त्यानंतर तिसरेही पीक पुढील तीन महिन्यांत घेतले जाणार असून, वर्षातून तीन वेळा भात पिकाचे उत्पादन घेतले जाणार आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी, तर उन्हाळ्यात कालव्याचे पाणी या भातशेतीला मिळणार असल्याने वर्षातून तीन पिके घेणे या शेतकर्‍याला शक्य होणार आहे. विक्रमी भाताचे उत्पादन मिळेल, अशी आशा या शेतकर्‍याने बोलताना व्यक्त केली आहे.

रायगड जिल्ह्यात कृषी क्षेत्रात शासन व शेतकरी प्रगती करण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. एवढेच नव्हे तर, पिकाचे उत्पादन वाढावे यासाठी भर दिला जात आहे. शासनाकडून पीक विमा, पेरणी व लागवडीसाठी तसेच कीटकनाशकासाठी मार्गदर्शन दिले जाते. इथली शेती व शेतकरी टिकला पाहिजे यासाठी शासन वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहात आहे. तर दुसर्‍या बाजूला इथल्या शेतकर्‍याची जमीन विविध प्रकल्पासाठी संपादित केली जात आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील शेतकरी पुरता उध्वस्त होत असून सध्या माणगाव तालुक्यात औद्योगिकीकरणासाठी जमीन भूसंपादनाचे काम वेगात सुरु आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यात वरकस व भातपिकाचे क्षेत्र यंदाचे वर्षी घटले असले तरी माणगाव तालुक्यात 206 गावांतील शेतकर्‍यांनी यंदा 12589 हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली आहे. पिकाला पोषक पाऊस पडल्याने भाताचे पीक पोटर्‍यात आले असून, ते फुलले आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे.

रायगड जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतानाच विविध प्रकल्प शेतकर्‍यांच्या माथी मारून इथली जमीन काढून घेतली जात आहे. त्यामुळे शेतकरी नावा पुरता उरला आहे. माणगाव तालुक्यात दरवर्षी शेकडो हेक्टर शेतीचे क्षेत्र घटत आहे. सरसरी गेल्या 5 वर्षात हे क्षेत्र कमालीचे घटले आहे. गेल्या वर्षी भात पिकाचे सरासरी क्षेत्र 12589 होते. यंदा 1038 हेक्टर एवढे भात पिकाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे यंदाचे वर्षी शेतकर्‍यांनी 11281 हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी केली आहे. माणगाव तालुक्यात खरीप हंगामात 3293 मेट्रिक टन उत्पादन यंदा घटणार आहे. यावेळी या शेतकर्‍यांनी भातपिकाचे वर्षातून तीन वेळा उत्पादन करून रायगड जिल्ह्यातच नव्हे तर, संपूर्ण राज्यात नवा आदर्श शेतकर्‍यांपुढे ठेवला आहे.

सप्टेंबरमध्ये पहिली लागवड
सप्टेंबरमध्ये लावलेले भाताचे पीक हे नोव्हेंबर अखेरला पूर्ण तयार होऊन कापणी केली जाणार आहे. तोपर्यंत राखीव ठेवलेल्या जागेवर दुसरी रोपे तयार करून पुन्हा डिसेंबर महिन्यात लागवड करून फेब्रुवारीअखेरीस कापणीसाठी तयार असणार आहे. त्यानंतर मार्च, एप्रिल, मे या कालावधीमध्ये हे तीन महिन्यांमध्ये तिसरे पीक घेतले जाणार आहे.

दोन एकर जमिनीवर भाताची लागवड केली असून, हे पीक 84 दिवसांत तयार होणार आहे. एका वेळेस प्रतिएकरी 21 क्विंटल धान्य उत्पादन प्राप्त होईल, अशी अशा वाटत आहे. एका वर्षात तीन वेळा उत्पादन घेतल्यास 63 क्विंटल भाताचे उत्पन्न मिळणार आहे.

विजय मेथा, शेतकरी
Exit mobile version