| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकुरवाडीच्या रस्त्याच्या 3/2 प्रस्ताव मंजुरीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. खालापूर तहसील कार्यालयासमोर गुरुवारी (दि.24) सकाळी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहेत.
या गावांना रस्ता मिळावा यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेली 4 वर्षांपासून वन विभागासह जिल्हा प्रशासनाकडे विनंती अर्ज, आंदोलने, मोर्चे यांसह उपोषण करण्यात आले. मात्र, खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे तीन वर्ष उलटूनही वन हक्क कायदा 2006 चे कलम 3/2 नुसार या रस्त्यासाठी आवश्यक वन जमिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली नाही. येथील ग्रामस्थांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पायपीट करून हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे एकीकडे भारत देश महासत्ता होत असल्याच्या वल्गना होत असताना या दोन्ही वाड्यांतील आदिवासींच्या नशिबी आजही नरक यातना येत आहेत. या रस्त्याचा 3/2 प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करून तो मंजुरीसाठी पाठवावा, अश्या प्रशासनाला सूचना दिल्या असतानाही परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडी येथील ग्रामस्थ खालापूर तहसील समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.







