। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील ढवर येथील प्रभाकर राणे यांच्या मालकीच्या जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून ग्रामसेवकांनी पदाचा गैरवापर करीत असेसमेंटची नोंदही दप्तरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामसेवकांच्या या कारभाराविरोधात राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. या नोंदीमध्ये राजकीय हस्तेक्षेप असल्याचे सांगण्यात आले आहे.
ढवर गावातील प्रभाकर धर्मा राणे यांची गट नंबर 775 मध्ये मालकीची मिळकत आहे. या मिळकतीमध्ये शिवराम पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केले. हे बांधकाम नियमीत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. ही बाब राणे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांच्या निदर्शनास आणून दिली. हा गैरप्रकार होत असल्याचे सांगूनदेखील ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत शिवराम पाटील यांनी बांधलेल्या अनधिकृत घराच्या असेसमेंटची नोंद दप्तरी केली. त्याविरोधात राणे यांनी आपल्या हक्कासाठी लढा सुरु केला आहे. गुरुवारी (दि.15) स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी उपोषण सुरु केले आहे.
ढवर येथे असणार्या गट क्रमांक 775 ही मिळकत मालकीची आहे. त्याचे पुरावेदेखील ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत. या जागेत शिवराम पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. या बांधकामास परवानगी देऊ नये. असेसमेंटची नोंद करू नये, अशी मागणी करून लेखी पत्र दिले. तरीदेखील असेसमेंटची नोंद ग्रामसेवकांनी केली. ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे मोठी हानी झाली आहे. त्यासाठी उपोषणाला बसलो आहे.
– प्रभाकर राणे, ढवर