। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
कास येथील बीएसएनएलच्या मोबाईल मनोर्याची सेवा गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झाली आहे. त्याचा फटका मडुरा दशक्रोशीतील गावातील ग्राहकांना बसला असून, गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. येत्या आठ दिवसांत बीएसएनएलचे नेटवर्क सुरळीत न झाल्यास 15 ऑगस्टला सावंतवाडी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा विलास पावसकर यांनी दूरसंचार विभागाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
त्यांनी या निवेदनात म्हटले आहे, कास येथील मोबाईल टॉवरवर पंचक्रोशीतील हजारो ग्राहक अवलंबून आहेत. ग्रामीण भागात बीएसएनएलला नेटवर्क असल्यामुळे ग्राहक याच कंपनीच्या सेवेला प्राधान्य देतात; मात्र गेले पंधरा दिवस विजेच्या खेळखंडोबामुळे बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाले आहे. याचा फटका पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये ग्राहकांना बसला आहे. कास येथील टॉवरला चार्जिंग बॅटरी नसल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. येत्या चार दिवसांत बॅटरी बसविण्यात यावी; अन्यथा 15 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.






