| कर्जत | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्राम पंचायत हद्दीतील कल्पतरू गृह पकल्प विरोधात स्थानिक शेतकरी ग्रामस्थ यांचे सुरू असलेले उपोषण सलग तिसर्या दिवशीही सुरू आहे. स्थानिकांना काम मिळावे म्हणून स्थानिक ग्रामस्थ आग्रही मागणी करीत आहेत. उपोषणस्थळी तालुक्यातील सामाजिक संघटना, पोलीस मित्र संघटना, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, मनसे अशा विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी भेट देत आहेत.
नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी उपोषणाच्या दुसर्या दिवशी उपोषणकर्यांची भेट घेऊन चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार त्यांनी उपोषण करते आणि कल्पतरू कंपनी व्यवस्थापक यांना नोटीस द्वारे दि.18 मे रोजी दुपारी 2 वाजता एका बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीला कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कोणीही प्रतिनिधी आले नाही. सदर साखळी उपोषण असेच सुरू राहणार असून काही तोडगा निघाला नाही तर मंगळवार (दि.23) मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अमरण उपोषण सुरू करणार आहेत, अशी माहिती ग्रामस्थांच्या वतीने नंदकुमार धामणसे यांनी दिली.