माथेरानच्या मूलभूत सुविधांसाठी उपोषण

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानची एक नवीन शासकीय ओळख बनत चालली असून, समस्यांचे गाव असे आता त्यांना संबोधू लागले आहे. कारण, कोणत्याही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष केल्याशिवाय माथेरानकरांना त्यांचा हक्क मिळत नाही. याचा प्रत्यय आता माथेरानबाहेरील लोकांना येऊ लागल्यामुळे या लढ्यामध्ये तेही सामील होऊ लागले आहेत. याचा प्रत्यय नुकताच कर्जत येथील माथेरानकरांच्या उपोषणावरून दिसून आला.

माथेरानमधील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी तसेच दिव्यांग, वयोवृद्ध नागरिकांना लागणार्‍या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी कर्जतला जावे लागत आहे. त्यामुळे दिव्यांग, वयोवृद्ध, शालेय विद्यार्थी व नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. तेव्हा सेतू केंद्रांतर्गत येणारे सर्व प्रकारचे दाखले माथेरानमध्ये मिळावे, अधीक्षकपदाची तात्काळ नियुक्ती व्हावी, अशा माथेरानच्या अनेक मागण्यासंदर्भात कर्जत येथील स्वराज्य संविधान रक्षक सेना (पॅन्थर आर्मी) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशील जाधव यांनी कर्जत येथे उपोषण सुरु केले होते. याची प्रशासनाने गंभीर दखल घेत आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील कार्यवाही सुरु आहे, लवकरच त्या सोडवण्यात येतील, असे पत्र त्यांना प्राप्त झाल्याने जाधव यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. दरम्यान, समस्त माथेरानवासियांतर्फे सुशील जाधव यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी माथेरान मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनीही या उपोषणास पाठिंबा दिला होता.

Exit mobile version