। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील श्री राम मंदिरासमोर निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून शार्लोट लेकच्या स्वच्छतेसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. गेल्या 10 वर्षांपेक्षा अधिक काळ होऊनही माथेरानमधील पिण्याच्या पाण्याचा तलाव स्वच्छ करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. परिणामी, पावसाळ्यातील दिवसांमध्ये रोगराई वाढत आहे तर अशुद्ध पाण्याचा पुरवठाही होत असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू आहे.
निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनने माथेरान नगरपालिकेला अगोदर निवेदन देऊन हा तलाव पावसाळ्यामध्ये स्वछ करावा, अशी मागणी केली होती. जून 25 पर्यंत तलाव स्वच्छ न झाल्यास आमरण उपोषण केले जाईल, असा इशाराही दिला होता. परंतु या कालावधीमध्ये काम सुरू न झाल्याने बुधवारपासमन संघटनेचे अध्यक्ष संतोष कदम आमरण उपोषणास बसले आहेत.
शार्लेट तलाव हे माथेरान नगरपालिकेच्या मालकीचे असून अमृत 2 या कार्यक्रमांतर्गत माथेरान नगर परिषदेकडून शार्लेट तलाव सुशोभीकरण करण्याकरिता 4 कोटी 99 लाख 82 हजार इतके अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, पनवेल कार्यालयाकडून त्यास 6 फेब्रुवारी 2023 रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. सदर अंदाजपत्रक तलावातील गाळ काढण्याचे व वाहतूक करून टाकणे तसेच तलावातील गेट व ब्रिज बाजूची दुरुस्तीसाठीची तरतूद होती. त्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती.
त्याचप्रमाणे माथेरान नगर परिषदेस राज्य शासनाने राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत माथेरान येथील शार्लेट तलावास पर्यावरणदृष्ट्या संवर्धन व संरक्षण करण्यासाठी 7 मार्च 2007 रोजीच्या शासन निर्णयानुसार 362.65 लक्ष इतक्या मंजूर निधीतील राज्य हिश्शापोटी रुपये 326.38 लक्ष इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मंजूर रकमेपैकी 2 कोटींचा निधी आतापर्यंत वितरीत केला असून माथेरान नगर परिषदेच्या 2 मार्च 2023 रोजीच्या पत्रानुसार उर्वरित कामे करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी नगर परिषदेस उपलब्ध करून दिला असल्याने 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिसून येत आहे. परंतु या निधीचा वापर तलावाच्या स्वच्छतेसाठी व सुशोभीकरणासाठी न होता इतरत्र वापरला गेला किंवा काहीतरी मोठा घोटाळा झाला असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.
निसर्ग पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनने वारंवार तलाव स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणार्या शासनाविरोधात दंड थोपटले असून माथेरानला येणार्या पर्यटकांना व स्थानिकांना अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने हा तलाव तातडीने स्वच्छ व्हावा, यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणास माथेरानमधील सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. यावेळी संघटनेचे योगेश शिंदे, अविनाश गोरे, सीमा कदम, जगदीश कदम, विजय सावंत व अन्य सदस्य उपस्थित होते.