तहसीलदारांच्या आश्‍वासनानंतर उपोषण स्थगित

। सुधागड -पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी गौळमाळ येथील माजी उपसरपंच संतोष बावधाने हे सोमवारी (ता.16) पाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र पाली-सुधागड तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर बावधाने यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. मंगळवारी (ता.17) संतोष बावधाने यांनी यासंदर्भातील निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

या निवेदनात संतोष बावधाने यांनी म्हटले आहे की या रस्त्यासंदर्भात योग्य कारवाई करू असे आश्‍वासित केल्यामुळे मी माझे उपोषण रविवार 22 पर्यंत स्थगित केले आहे. मात्र तहसीलदारांनी यासंदर्भात दिलेले आश्‍वासन पूर्ण न झाल्यास सोमवार (ता.23) पासून पाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. असा इशारा देखील बावधाने यांनी निवेदनात दिला आहे. तर तहसीलदारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बावधाने यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने तालुका समन्वय समिती अध्यक्ष, गटविकास अधिकारी व शाखा अभियंता यांच्या सोबत तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी बैठक घेऊन हा रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून रस्त्यासंदर्भात उपयोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे पत्रात नमूद केले आहे. या लेखी आश्‍वासनानंतर संतोष बावधाने यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.

Exit mobile version