अरविंद गायकर यांचा इशारा
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड समुद्र किनार्याचा विकास होत आहे. हा विकास होत असताना पर्यटकांना सुविधा पुरविणार्या 45 टपरीधारकांना गाळे उपलब्ध करून देणार होते. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही. विकास करताना टपरीधारकांवर अन्याय करु नका, त्यांना विकास आराखड्यात सामावून घ्या, अशी मागणी पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी केली आहे.
मुख्याधिकारी आम्हाला चर्चेला किंवा आमच्या गाळ्यांबाबत काय भूमिका घेणार हे सुद्धा सांगत नाहीत. सहा पत्र देऊनसुद्धा आम्हाला चर्चेला बोलावले जात नाही. त्यामुळे या टपरीधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व सहकार्यांसोबत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा श्री. गायकर यांनी दिला आहे.
मुरुड नगरपरिषदेच्या अधिकृत यादीत 45 टपरीधारक वर्षाला आठ हजार रुपये भरून आपला व्यवसाय करीत आहेत. समुद्र किनार्याचा विकास होत असताना त्यांना स्वतंत्र गाळे देण्याचे अभिवचन देण्यात आले होते. परंतु, याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने पत्रकार परिषद घेऊन टपरीधारकांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी उपाध्यक्ष ज्योती मसाल, सचिव शैलेश वारेकर, सहसचिव दामोदर खांरगावकर, खजिनदार दीपक जोशी, माजी उपाध्यक्ष देवेंद्र सतविडकर, गोपाळ शर्मा, इम्तियाज शाबान, रुपेश पाटील, उमेश दांडेकर, शकील शाबान, महेंद्र पाटील आदींसह पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.