। बीड । वृत्तसंस्था ।
दुकाचीवरून प्रवास करत असताना सेल्फी काढण्याच्या नादात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सेल्फी आणि रील्सच्या नादात अनेकांचे नुकसान झाले आहे, तर कित्येकांनी आपला जीवही गमावला आहे. असाच एक प्रकार बीडमध्ये घडला आहे. सेल्फीमुळे दोन मित्रांचा भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर वेगात असलेल्या दुचाकीवर मागे बसलेला तरुण सेल्फी कॅमेऱ्याच्या माध्यमातून रिल करत होता. तर, दुचाकी चालवणारा तरुण मागे वळून पाहून कॅमेऱ्याला बोटांनी व्हिक्टरी साईन दाखवत होता. विशेष म्हणजे बाईक चालवत असलेला तरुणदेखील रिल तयार करण्यासाठी फोनमध्ये बघण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.