अलिबागमधील तरुण गंभीर जखमी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पोलादपूरहून अलिबागकडे जाणाऱ्या तरुणाचा रविवारी (दि.8) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोयनाड नागोठणे मार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र, दिशा दर्शक फलक न लावल्याने दुचाकीचा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अपघाताला ठेकेदारच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अलिबागमध्ये राहणारा नंदीश गणेश सकपाळ हा तरुण पोलादपूरला गावी पालखी सोहळ्यासाठी गेला होता. हा कार्यक्रम आटोपून तो रविवारी दुपारनंतर अलिबागकडे निघाला. पोलादपूरकडून अलिबागकडे येत असताना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नागोठणे जवळील टाऊनशीप जवळ आल्यावर त्याचा भीषण अपघात झाला.
या मार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. खोदकाम ठिकठिकाणी करण्यात आले आहे. मात्र, पर्यायी रस्ता म्हणून दिशादर्शक फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप होत आहे. नियोजन शुन्य काम व दिशादर्शक फलकांचा अभाव अशा अनेक कारणामुळे अपघात होत आहे. प्रवासी व चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. नंदेश सकपाळ या तरुणावर उपचार सुरु आहेत. त्याच्या अपघाताला कंपनीसह ठेकेदार जबाबदार आहे. त्यामुळे संबंधितांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.







