। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. 42 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. एका गाडीने दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या स्लीपर कोच बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोटा जिल्ह्यातील कैथुन पोलीस स्टेशन परिसरातील अरनखेडा गावाजवळील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने बसला धडक दिल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. या धडकेत बसच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्घटनेत 8 जण गंभीर जखमी झाले असून, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चालकाचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. अपघात इतका भीषण होता कि बसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याप्रकरणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.






