| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावर संगमेश्वरमधील ओझरखोल येथे एसटी बस आणि मिनी ट्रॅव्हलर बस यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील संगमेश्वरच्या ओझरखोल येथे एसटी बस आणि मिनी बस यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. एसटी बस ही रत्नागिरीवरुन चिपळूणच्या दिशेने जात होती. तर मिनी बस ही रत्नागिरीच्या दिशेने पुढे येत होती. त्यादरम्यान हा अपघात झाला. एसटी बस आणि मिनी बसच्या धडकेमध्ये दोन्ही वाहनांमधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिनी बसचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी चालकाला प्राथमिक उपचारांनंतर रत्नागिरीला हलवण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस आणि मिनी बस यांची धडक इतक्या जोरात झाली, ही दोन्ही वाहनांच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. यात मिनी बसचा चालक हा बसच्या कॅबिनमध्ये अडकला गेला. त्याला कॅबिनमधून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अर्धा तासानंतर चालकाला बाहेर काढण्यात आले.







