। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने गाईला जोरदार धडक दिल्याने या अपघातात गायीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकींवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना मंगळवारी (दि.11) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या दिशेने योगेश चव्हाण (30), रोहित चव्हाण (25) दोघेही रा. सातारा सध्या राहणार वांद्री दुचाकीवरून येत असताना धामणी येथील अथर्व क्लीनिकच्या समोर रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने दुचाकी चालक घाबरून गेल्याने चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी थेट गाईला जाऊन धडकली. यात दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. दुचाकीची गाईला बसलेली धडक एवढी जबरदस्त होती की गायीचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील जखमींना उपचारासाठी संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनस्थळी दाखल झाले. दुचाकीवरील एका प्रवाशाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन कानातून रक्तस्त्राव सुरु होता. तर दुसऱ्या प्रवाशालाही गंभीर दुखापत झाल्याने येथील डॉक्टर रिशप सिंग यांनी प्राथमिक उपचार करून दोघांनाही अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.







