ट्रकचालक, क्लिनर जागीच ठार
| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. ट्रकमधील क्लिनर टायरमधील हवा तपासण्यासाठी खाली उतरला असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रेलरने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रेलरमधील कॉईल केबिनवर पडल्याने केबिन दबून चालकाचाही मृत्यू झाला.
ट्रक कराडवरून माल घेऊन नवी मुंबईकडे जात असताना तो द्रुतगती मार्गावरील बोरघाटात आडोशी गावाजवळ आला असता हवा तपासण्यासाठी चालकाने ट्रक (एमएच 43 वाय 9455) रस्त्याच्या कडेला थांबवला. क्लिनर खाली उतरला असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने (एमएच 46-बीएम-3701) त्याला जोरदार धडक दिली. यात क्लिनर राहुल बाळू मेटे (26, रा. कोपरखैरणे-नवी मुंबई याचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागे असलेल्या क्वॉईल तुटल्याने त्या केबिनवर पडल्याने चालक विनोद गौड, रा. उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, आयआरबी टीम अपघातग्रस्त टीमचे सदस्य, देवदूत टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रेलरमध्ये अडकलेल्या चालकांना बाहेर काढले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.