। खोपोली । प्रतिनिधी ।
मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत सुरूच असून भरधाव वेगात असलेल्या ट्रेलरचा टायर फुटून ट्रेलरने समोरील टेम्पोला जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहने 100 फूट दरीत कोसळली. या अपघातात ट्रेलर चालक ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.
पुण्याहून मुबंईकडे जात असताना ट्रेलर बोरघाटात ढेकूजवळ आला असता ट्रेलरचा टायर फुटल्याने ट्रेलरने समोरील टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पो आणि ट्रेलरची केबिन 100 फूट दरीत कोसळली. यामध्ये ट्रेलर चालक अजित जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पोमधील चालक गंभीर जखमी झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी ट्रेलरमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी दाखल केले.