पेण-खोपोली मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच
| पेण | प्रतिनिधी |
पेण-खोपोली मार्गाचे काम नव्याने सुरु असून, या मार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी सकाळच्या सुमारास झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन तरुणांना प्राण गमवावे लागले. पहिला अपघात गागोदे येथे, तर दुसरा अपघात सावरसई येथे झाला. या अपघातांची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पहिल्या अपघातामध्ये मनोज शांताराम पाटील (37) रा. कमलपाडा, ता. अलिबाग हा तरुण आपल्या मोटारायकल (एमएच 06 बीझेड 8443) वरुन प्रवास करीत होता. त्याचवेळी टेम्पो (एमएच 06 बीडब्ल्यू 0579) वरील चालक कल्पेश करेबेत याच्या हलगर्जीपणामुळे मनोजच्या मोटारसायकला अपघात होऊन तो जागीच ठार झाला. तर, दुसरा अपघात सावरसई येथे झाला असून, या अपघातामध्ये संदीप सुरेश शिर्के (30), रा. पाडले, पो. सावरसई, ता. पेण या तरुणाचा मृत्यू झाला. संदीप हा (एमएच 06 सीएफ 3336) स्कुटीवरुन प्रवास करत असताना (एमएच 04 एफआर 9763) या कारने समोरासमोर ठोकर दिल्याने त्याचा मृत्यू झाला. हे दोन्ही अपघात पावणे सात ते साडेसातच्या दरम्यान झाले आहेत. पेण पोलीस ठाण्यात या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.