| पुणे | प्रतिनिधी |
पुणे- सातारा महामार्गावर ससेवाडी उड्डाणपुलाच्या उतारावरुन येणाऱ्या भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटुन भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी (दि.30) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रक सातारा-पुणे या विरोधी लेन वर जाऊन त्याने एका कंटेनर सह एक पिकअप जीप व तीन दुचाकींना ठोकरल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील दोघांचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात दुचाकी मोटारसायकल वरील प्रथमेश रेडेकर (32) रा. सांगली याचा व केटीएम दुचाकीवरील चालक दिव्यम सुनिल निकम (31) रा.नेहरुनगर धुळे या दोघांचा दुदैवी मृत्यु झाला तर पिकअप जीप चालक संजय श्रीरंग खाटपे (42) ता.भोर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन जखमी झाले आहेत. अपघात घडल्या नंतर तेथील स्थानिक नागरीकांनी तसेच तेथील डब्लु ओ एम कंपनीच्या रुग्णवाहिकेने तातडीने मदत करत जखमींना रुग्णालयात नेले. परंतु, या मधील प्रथमेश व दिव्यम या दुचाकीचालकांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला असल्याचे भारती हाँस्पिटल पुणे येथील डाँक्टरांनी सांगितले. अपघातास जबाबदार असलेला ट्रक चालक मेहताब दफेदार रा. कोठावली पश्चिम बंगाल यास अटक करण्यात आल्याची माहीती पोलिस हवालदार सागर गायकवाड यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.





