समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; बारा जणांचा मृत्यू

। छ.संभाजी नगर । वृत्तसंस्था ।

छत्रपती संभाजी नगरच्या समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यात काही लहान बालकांचा देखील समावेश आहे. सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला असल्याचे कळत आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे अपघातात मृत व्यक्तींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

30 जण करत होते प्रवास
ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. अपघातात12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच काही महिला देखील आहेत.
अपघातातील मृतांची नावं
तनुश्री लखन सोळसे (5 वर्षे, समतानगर-नाशिक)
संगीता विलास आठवले (वय 40 वर्षे, निफाड-नाशिक)
अंजाबाई रमेश जगताप (वय 38 वर्षे, राजूनगर-नाशिक)
रतन जमधडे (वय 45 वर्षे, संत कबीर नगर-नाशिक)
काजल लखन सोळसे (वय 32 वर्षे, गवळाणी-नाशिक)
रजनी गौतम तपासे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक)
हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 30 वर्ष, निफाड-नाशिक)
झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 50 वर्षे, राजूनगर-नाशिक)
अमोल झुंबर गांगुर्डे (वय 18 वर्षे)
सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्षे)
मिलिंद पगारे (वय 50 वर्षे, निफाड-नाशिक)
दीपक प्रभाकर केकाणे (वय 47 वर्षे, पिपळगाव-नाशिक)

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस देखील दाखल झाले असून, मदतकार्य सुरू आहे.

नरेंद्र मोदींनी ट्विट करुन संभाजीनगरच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50  हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले
Exit mobile version