अश्वपालकावर जीवघेणा हल्ला

पळून जाण्यास यशस्वी झाल्याने जीव वाचला

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ ग्रामपंचायत मधील जुम्मापट्टी धनगर वाडा येथे राहणाऱ्या दोन अश्वपालांमध्ये घोडेस्वारीवरून वाद झाले होते. याचे पर्यवसान रविवारी सायंकाळी बाहेरचे अनोळखी व्यक्ती बोलावून जीवे ठार मारण्याचा प्रकार नेरळ माथेरान घाटरस्ता जवळील धसवाडी येथे झाला. दरम्यान, जखमी अश्वपालक चंद्रकांत शिंगाडे हे जखमी अवस्थेत पळून जाण्यात यशस्वी ठरल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विविध 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीत दि. 02 जुलै रोजी 6.20 वा.च्या सुमारास नेरळ माथेरान घाटरस्त्यावरील धसवाडी स्टॉपवर येथे मुळवाशी अश्वपाल संघटना आणि अश्वपालक असलेले धनगर समाजातील तरुण यांच्यात पुन्हा वाद झाला. घोडेस्वारीवरून त्या दोघात वाद सुरु होते आणि शेवटी रविवारी सायंकाळी संघटनेचे अध्यक्ष यांनी मनात राग धरुन गुन्हेगारी कट रचून यातील अनोळखी 10 ते 11 आरोपींना फिर्यादीस जीवेठार मारण्याची सुपारी दिली होती. दरम्यान, फिर्यादी व त्याचे मित्र मोटारसायकलने माथेरान येथे जात असताना धसवाडी स्टॉपवर थांबवले. तेथे एक मरुन रंगाची व एक काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनांमधून आलेले 11 ते 12 अनोळखी तरुण हजर होते. फिर्यादी चंद्रकांत शिंगाडे हा आपले मित्र अथर्व पिंगळे यांच्यासह मोटार सायकलवर बसले असताना चंद्रकांत शिंगाडे यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने वरील अनोळखी आरोपींनी फिर्यादी यांचे डोक्यात लोखंडी रॉड, लाकडी दांडके, फायबर स्टीक, लोखंडी सळ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत चंद्रकांत शिंगाडे गंभीर जखमी झाले असून, त्यांचे दोन्ही हात व पाय फॅक्चर झाले आहेत.

या घटनेत पोलिसांनी चंद्रकांत शिंगाडे यास मारण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि दोन चार चाकी वाहने ताब्यात घेतली आहेत. जखमी अश्वपालक पनवेल येथील महाडिक रुग्णालयात उपचार घेत आहेत. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version