पेणमधील सीएनजी पंपाजवळील घटना
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पेणमध्ये एका एसटी कर्मचार्यावर सोमवारी (दि.21) सायंकाळी जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एसटी कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याबाबतचा व्हीडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेने एसटी कर्मचारी सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याची प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळ रायगड विभागातील पेण एसटी बस आगारात चालक म्हणून कार्यरत असणारा चालक प्रवाशांना घेऊन पेण-जिते असा प्रवास करीत होता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी जिते येथील सीएनजी पंपाजवळ आल्यावर समोरून अचानक मारुती व्हॅगनर कार रस्ता ओलांडून सीएनजी पंपात गेली. त्यावेळी एसटी कर्मचार्याने बसमधून उतरून मारुती कारमधील व्यक्तीला जाब विचारला. याचा राग धरून कारमधील तिघांनी मिळून एसटी कर्मचार्याला शिवीगाळी करीत बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. प्रवाशांनीदेखील या मारहाणीबाबत संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मनिष म्हात्रे अधिक तपास करीत आहेत.
सीएनजी पंपामध्ये एसटी कर्मचार्याला मारहाण केल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या घटनेने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत. या घटनेच्या दोन दिवस अगोदर अलिबाग-पेण मार्गावरील सागाव मारुती येथे एसटी बस चालकाला मारहाण करण्यात आली होती. किरकोळ कारणावरून हा वाद झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. प्रवाशांना सुरक्षीत सेवा देणार्या कर्मचार्यांच्या हल्ल्यामुळे एसटी कर्मचार्यांची सुरक्षा धोक्यात येऊ लागली आहे. हा वाद एसटी कर्मचारी आणि त्रयस्थ व्यक्तींचा असला, तरीदेखील एसटीतील प्रवाशांनादेखील त्याचा प्रचंड त्रास होतो. याकडे लक्ष देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.