| नेरळ | वार्ताहर |
नेरळ गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. राजेन्द्रगुरुनगर भागात राहणाऱ्या तरुणांमध्ये बांधकाम साईटच्या कारणाने वाद झाले. या वादातून तरुणाने आपल्या मित्राच्या मदतीने एका तरुणावर लोखंडी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून तरुणांवर उपचार सुरु आहेत. हल्ला करणारे दोघे तरुण हे सज्ञान नसल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली नाही.
सोमवारी (दि. 15) सकाळी 11 च्या सुमारास अझर खुर्शीद अन्सारी यांना राजेन्द्रगुरुनगर भागातील दोन तरुणांनी मारहाण केली म्हणून नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. कुंभार आळी भागात राहणारे अक्षर अन्सारी (24) हा तरुण आपल्या बांधकाम साईटवर पोहचला. मोबाईलवर गेम खेळत बसलेला अझर अन्सारी बेसावध असताना त्याच्यावर (17 आणि 15 वर्षीय) दोन तरुणांनी लोखंडी कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हल्ला करणारे दोघे तरुण हे सज्ञान नसल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार लोखंडे करीत आहेत.