| नाशिक | प्रतिनिधी |
समृद्धी महामार्गावर खंबाळे ता. सिन्नर शिवारात बुधवारी (दि.4) पहाटे दोनच्या सुमारास भरधाव कार कंटेनरखाली घुसल्याने कारमधील दोघांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. मृत व जखमी छत्रपती संभाजीनगरचे आहेत. हे सर्वजण बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते असून, मुंबई येथील पक्षाचा कार्यक्रम आटोपून छत्रपती संभाजीनगरकडे परतत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेली कार पुढे चालणाऱ्या कंटेनरला पाठीमागून धडकली. गोंदे इंटरचेंज सोडल्यानंतर खंबाळे शिवारात हा अपघात झाला. गोंदे इंटरचेंज येथील महाराष्ट्र सुरक्षारक्षक पथक, महामार्ग सुरक्षा पोलिस, रुग्णवाहिका व आपत्कालीन मदत पथक घटनास्थळी पोचले. कारमधील प्रवाशांना ओढून बाहेर काढावे लागले. अपघातात सचिन बनसोडे (33) यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी पाच जणांना सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान प्रशांत निकाळजे (31) यांचा मृत्यू झाला. सचिन साळवे (25), शुभम दांडगे (26), अनिल मनोहर (29) व शुभम दसारे (32) हे जखमी झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.