रसायनीत थिनर बनविणा-या कंपनीला भीषण आग

| रसायनी | प्रतिनिधी |

रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एम आयडीसी परीसरातील कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील थिनरचे उत्पादन करणा-या सोनी केमिकल कंपनीला शुक्रवारी (दि.10) दुपारच्या सुमारास आग लागून आगीने रुद्र रुप धारण केल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. उन्हाचा तडाख्यात दुपारची वेळ असल्याने अग्निशमन दलांना आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दुपारी तीन वाजेपर्यत पाच अग्निशामक घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. यानंतर आणखी दोन अग्निशामक दलाचे नौजवान घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, सोनी केमिकल या लहानशा कंपनीत अंदाजे आठ ते दहा कामगार काम करतात. या कंपनीत राॅ मटेरिअलवर क्रीया करुन कलरमध्ये वापरात येणारे थिनर बनविले जाते. आग लागताच तेथील कामगार कंपनी बाहेर आल्याची विश्वसनीय सुत्रांनी माहिती दिली आहे. दैव बलवत्तर म्हणून मनुष्यहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आग आटोक्यात आणण्यासाठी तीन ते साडेतीन तास अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्न करावे लागले. आग लागल्याचे समजताच रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर, एपिआय लहांगे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Exit mobile version