परिसरातील गावागावात चर्चेला उधाण
। अलिबाग । प्रतिनिधी ।
निवडणुकीत 60 हजारांचा लीड घेण्याच्या बाता आमदार दळवी यांनी अनेक प्रचार सभांमधून मारल्या. परंतु, प्रचारादरम्यान त्यांना मतदारांचा प्रतिसाद दिसून आला नाही. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून, पराभवाच्या भीतीने चौताळले आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे सतत दळवींचे खबरी म्हणून काम करणार्या खानावमधील एका बड्या नेत्यासह त्याच्या पुत्राला मते न मिळाल्यास थळमध्ये यायचे नाही, अशी तंबीच आमदार दळवींनी भरली असल्याची चर्चा असून, खानाव परिसरातील गावागावात या चर्चेला उधाण आले आहे.
खानावमधील हा बडा नेता गेली काही वर्षे काँग्रेसमध्ये होता. खानाव ग्रामपंचायतीवर असलेली एकहाती सत्ता तेथील निलेश गायकर या नेतृत्वाने हिसकावून घेतली. त्यामुळे त्या नेत्याचे खानावमधील अस्तित्व कमी होऊ लागले होते. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी काँग्रेसला राम राम करीत थळमधील दळवींचे घर गाठले. गेल्या दोन वर्षांपासून ते आमदार दळवींचे फॅन झाले आहेत. दळवींच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात ते पुढे असायचे. परंतु, निवडणुकीत मते मिळाली नाही, तर थळमध्ये यायचे नाही, असा दम या नेत्यासह त्याच्या पुत्राला दळवींनी भरल्याची चर्चा खानावमध्ये सुरु आहे. त्यामुळे खानावमधील या पिता-पुत्रांवर आता पश्चातापाची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये असतानादेखील एकेकाळी दळवींना सर्व माहिती पुरविण्याचे काम ते करायचे, असा आरोप येथील नागरिक करीत आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी मल्याण येथील शेतकर्यांनी भूसंपादन करण्यास आलेल्या अधिकार्यांविरोधात आंदोलन पुकारले होते. त्या आंदोलनाची इत्यंभूत माहितीदेखील दळवींना बांधावरील कोपर्यात नेऊन दिल्याचे येथील मंडळी सांगतात. मात्र, नियती वेळ आल्यावर अद्दल शिकवतेच. ज्या दळवींपुढे हा नेता लोटांगण घालत होता, त्याला आणि त्याच्या पुत्राला त्याच दळवींनी लाथाडल्याची चर्चा असून, चांगलाच दम भरल्याचे बोलले जात आहे.