| सिडनी | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर रविवारी (दि.14) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी एक हजारांहून जास्त संख्येनं जमलेल्या समुदायावर भीषण हल्ला केला. या दोघांनी बरोबर आणलेल्या ऑटोमॅटिक रायफल्समधून समोर जमलेल्या जमावावर अंदाधुंद गोळीबार केला. शेकडो लोक जिवाच्या भीतीने सैरावैरा पळू लागले. या हल्ल्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख जाहीर केली असून त्यानुसार एक हल्लेखोर नवीद अक्रम (24) तर दुसरा हल्लेखोर नवीदचाच पिता साजिद अक्रम (50)होता. यापैकी साजिदचा घटनास्थळीच पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला असून नवीदला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बोंडी बीचवरील हल्ल्यावर निवेदन जारी केले असून घडलेल्या प्रकाराचा आपल्याला धक्का बसल्याचे नमूद केले आहे. प्रशासन नागरिकांना सर्वतोपरी मदत करत असून एनएसडब्ल्यू पोलीस घटनेची सखोल चौकशी करत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.







