झोंबडी ग्रामपंचायतीचा ठराव; सरपंचांच्या निर्णयाचे कौतुक
| गुहागर | प्रतिनिधी |
तालुक्यातील झोंबडी गावामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय करणार्या सासर्याने नवविवाहीत सुनेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक झालेल्या विजय शांताराम सकपाळ याला गावातून हद्दपार करण्यात यावी, असा एकमुखी ठराव झोंबडी ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या ग्रामसभेत करण्यात आला. सरपंच अतुल लांजेकर यांनी याबाबत घेतलेल्या पुढाकारचे सर्वांनी कौतुक केले आहे. तसेच यापुढे गावात अशाप्रकारचे कृत्य कोणी केल्यास तशाच प्रकारे कारवाई केली जाणार आहे.
झोंबडी येथील विजय शांताराम सकपाळ या साठ वर्षीय इसमाने आपल्याच 21 वर्षीय सुनेचा सातत्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सुनेने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून गुहागर पोलीस स्थानकात 25 रोजी सासर्या विरोधात गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा दाखल होवून दोन दिवस उलटून गेले तरी संबधीत इसमाला पोलीसांनी अटक न केल्याने गुहागर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी आक्रमक होतं याचा जाब गुहागर पोलिसांना विचारल्यानंतर आरोपी सकपाळ याला अटक करण्यात आली.
