। अलिबाग । सायली पाटील ।
रायगड जिल्ह्यातील महाड, तलमाची निमाची वाडी येथे नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नराधम बापानेच आपल्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अतिशय घृणास्पद अशा या प्रकरणात बापानेच आपल्या मुलीवर बलात्कार केला. पीडित अल्पवयीन मुलीने अखेर अत्याचार सहन न झाल्याने तिने घडलेला सारा प्रकार पोलिसांत कळविला. त्यानंतर तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा खुलासा झाला.
वडील आणि लेकीच्या नात्याबद्दल कितीही सांगितलं किंवा चर्चा केली तरी शब्द अपुरे पडतील. पण काही विकृत माणसं या नात्याला हल्ली काळीमा फासणारे कृत्य करत आहेत. त्यांना आपल्या मुलीबद्दल किंवा परिवाराबद्दल काहीच वाटत नाही. ते वासनेत इतके आकांत बुडाले आहेत की, कुणासोबत आपण किती विकृत वागतो याचंही त्यांना भान राहत नाही. महाडमध्ये अशीच एक संतापजनक घटना घडल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बलात्कार प्रकरणातील आरोपीत हे पिडीत मुलीचे वडील असुन आरोपीने आपली 12 वर्षांची मुलगी ही तिच्या काकांच्या घरी झोपलेली असताना तिला घरी जेवण वाढायला पाठवुन दे, असा काकांकडे निरोप देऊन तिला घरी बोलावून घेतले. ती घरी आल्यावर वडीलांना जेवण वाढायला गेली असता, आरोपीने दाराला कडी लावून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही बाब सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना समजताच त्यांनी सर्वहारा जनआंदोलन संघटनेच्या माध्यमातून गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मंगळवारी (दि.24) आरोपीस ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीला 6 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
आरोपीने केलेल्या घृणास्पद गुन्ह्याबाबत माहिती मिळताच सर्वहारा जनआंदोलन संघटनेच्या माध्यमातून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात पोलिसांनी योग्य सहकार्य केले.
– उल्का महाजन