बहरलेल्या भात शेतीवर तुडतुड्याचा धोका
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने भात कापणी लांबणीवर जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यातच बहरलेल्या भात शेतीवर तुडतुड्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्ह्यामध्ये 94 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भात पिकांची लागवड करण्यात आली आहे. कोलम, सुवर्णा, रत्ना अशा अनेक पिकांना शेतकर्यांनी प्राधान्य दिले आहे. भातपीक बहरले आहे. काही ठिकाणी भातपीक कापणी योग्य आहे. तर, काही ठिकाणी आठ ते दहा दिवसांमध्ये कापणीला सुरुवात होण्याचे चित्र आहे. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे अनेक भागातील भातपीक आडवे झाले आहे. तसेच, शेतातील सखल भागात पाणी साचल्यामुळे भातपीक अडचणीत येण्याची शक्यता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. तयार झालेल्या पिकाच्या कापणीला पावसामुळे अडथळा निर्माण झाला असून भात कापणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव
परतीच्या पावसामुळे शेतकर्यांसमोर संकट निर्माण होत असताना भात पिकांवर तुडतुड्या व इतर किड रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. महाजनेसह बामणगाव, सुडकोली परिसरात भात पिकांवर या रोगांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. याबाबत कृषी विभागाला माहिती देऊनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
भात पीक चांगल्या पध्दतीने बहरले आहे. परंतु बदलत्या वातावरणामुळे भात पिकांवर त्यांचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भात पिकांवर तुडतुड्या व अन्य किड रोंगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. हातातोंडाशी आलेला घास या रोगांमुळे जाण्याची भिती आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
– रुपेश पाटील, शेतकरी







