बहिराम कोटक गाव बुडण्याची भीती

खांडी गेल्याने ग्रामस्थ भयभीत
| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले ही 16.44 किलोमीटरच्या खारबंदिस्तीचे काम गेली 2 वर्ष सुरु असून हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. वारंवार या खारबंदिस्तीला उन्हाळ्यापासूनच खांडी जात असल्याने सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यात संपूर्ण गाव जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या या खांडीवर मलमपट्टी करुन तात्पुरता उपाय केला जात होता. महत्वाची बाब म्हणजे बहिराम कोटक येथील दयानंद पाटील यांच्या घराच्या बाजुने आतापर्यंत 3 वेळा खांडी गेलेल्या आहेत व चौथ्यावेळेला देखील खांड जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

नारवेल-बेनवले खारबंदिस्तीसाठी जवळपास 50 ते 60 कोटी रुपयांची निधी वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने या योजनेसाठी मिळालेली आहे. परंतु, ज्या हेतूने शासनाने ही निधी उपलब्ध केलेली आहे. ते हेतु सफल होताना दिसत नाही. दयानंद पाटील यांच्या शेततळ्याला लागून खारबंदिस्तीला खांड गेली आहे. या खारबंदिस्तीसाठी दयानंद पाटील यांनी स्वतःच्या जमिनीतून जागा दिलेली आहे. मात्र, काम एवढे निकृष्ठ दर्जाचे सुरु आहे. की, एकाच जागेवर आत्तापर्यंत 3 वेळा खांड जाऊन चौथ्यावेळी देखील बंदिस्तीला पूर्ण भेगा जाऊन बंदिस्ती खाडीच्या बाजून सरकली आहे. दुर्दैवाने या पावसाळयाच्या दिवसात जर या ठिकाणी खांड गेली तर दयानंद पाटीलांच शेततळे व घर पूर्णताः उध्दवस्त होउन बहिराम कोटक गाव पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही योजनेला योग्यप्रकारे होण्यासाठी वालीच कुणी उरलेला नाही. असेच म्हणावे लागेल सरकरलेला बांध युध्दपातळीवर बांधला गेला नाही तर हजारो एकर जमीन पाण्याखाली यऊन समुद्राच्या भरतीचे पाणी वाशी गावापर्यंत येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

चार दिवस जागरण
बुधवार पासून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आणि अचानक खारबंदिस्ती खाडीच्या बाजूने सरकत असल्याचे जाणवले. शुक्रवारी तर त्या खारबंदिस्तीला मोठ -मोठया भेगा पडल्याच्या दिसल्या शनिवारी त्या भेगा मोठ्या झाल्या व बांधाची पीचिंग खाडीत सरकलेली दिसली. जेव्हा पासून बांधाला भेगा गेल्याच्या दिसल्या तेव्हापासून रात्रीची घरात झोप लागत नाही. केव्हाही खारबंदिस्ती फुटून घरात पाणी शिरेल याचा काही भरवसा नाही. आणि जर भरतीची वेळ असेल तर मग काही धडगतच नाही त्यामुळे घरात राहणे ही धोकादायक वाटू लागले आहे. रात्र रात्र जागून आम्ही काढत आहोत,अशी प्रतिक्रिया दयानंद पाटील यानी व्यक्त केली आहे.

बहिराम कोटक येथे बांधाला गेलेल्या भेगाविषयी व बांध खाडीत सरकल्याविषयी भ्रमंती ध्वनीवरून खारभुमीचे अधिकारी दादासाहेब सोनटक्के यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, बहिराम कोटक येथील बांध खाडीच्या बाजूने सरकला आहे. हे सत्य असून ते युध्दपातळीवर काम करून खांड बांधण्यात येईल.

दादासाहेब सोनटक्के , उपकार्यकारी अभियंता खारभुमी
Exit mobile version