यंदाही पावसाच्या पाण्याची भीती

उरण रेल्वे स्थानक प्रशासन सतर्क; पाणी काढण्यासाठी मोठाले पंप सज्ज

| उरण | वार्ताहर |

नवी मुंबई शहराला जोडणार्‍या उरणच्या रेल्वे स्टेशनमधील अंडरग्राऊंडमध्ये मागील वर्षी पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली होती. त्यामुळे रेल्वेच्या कामांची पोलखोल झाल्याने रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. मात्र, यावर्षीही उरण रेल्वे स्टेशन पाण्याखाली जाण्याची भीती असल्याने रेल्वे प्रशासन सतर्क झाल्याचे चित्र समोर येत आहे.

मुंबई शहराला जोडणारी उरण लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याची वाट गेली 50 वर्षे उरणची जनता पाहात असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात मार्च 2024 मध्ये उरण लोकल रेल्वे सेवेचा शुभारंभ केला. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मागील वर्षीच्या पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या उरणच्या रेल्वे स्टेशनमधील अंडरग्राऊंडमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पावसाचे पाणी शिरल्याची बाब समोर आली होती. यावेळी उरणकरांच्या स्वप्नावर रेल्वे प्रशासनाने पाणी शिंपडण्याचे चित्र समोर आले. मात्र, रेल्वेमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत ठोस उपाययोजना न करता किंवा संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई न करता उरणची रेल्वे सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील वर्षीची पुनरावृत्ती यावर्षीच्या पावसाळ्यात होणार अशी भीती रेल्वे प्रशासनाला वाटत असल्याने खबरदारी म्हणून उरण स्टेशनमध्ये साचणारे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी चक्क पाच मोठाले पंप सज्ज करुन ठेवल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

उरण हा खाडी किनार्‍यावर वसलेला तालुका आहे. उरण रेल्वे स्टेशनच्या अंडरग्राऊंडमध्ये मागील वर्षी पावसाचे पाणी साठवून राहिले होते. त्यामुळे यावर्षीही पावसाचे पाणी साठवून राहिले तर ते तात्काळ काढून टाकण्यासाठी खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनाच्या वतीने पाच वॉटर पंप आणून ठेवले आहेत.

गौतम कुमार,
उरण स्टेशन मॅनेजर
Exit mobile version