सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला केले 22 वाहनांचे वाटप
| रायगड | खास प्रतिनिधी |
केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी तीन वाजता देशातील लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. तत्पूर्वी, जिल्हा प्रशासनाला एक कोटी 76 लाख किमतीच्या 22 वाहनांचे वाटप करता यावे, यासाठी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे थेट हेलिकॉप्टरने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गतिमान प्रशासनासाठी 15 तालुक्यांतील तहसीलदारांना 15 बोलेरो आणि सात प्रांताधिकारी यांना सात स्कॉर्पिओ वाहने सुपूर्द करण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून अधिकाऱ्यांना वाहनांची प्रतीक्षा लागली होती. ती शनिवारी पूर्ण झाली. शुक्रवारी सकाळीच केंद्रीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार असल्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याआधी सरकारी कार्यक्रम आटपून घेण्याचा कल सरकारच्या मंत्र्यांचा होता. तसेच विविध कामांना अंतिम टप्प्यात मंजुरी देण्याच्या फायलींवरदेखील धडाधड स्वाक्षऱ्यादेखील झाल्या.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वाहनांचे वितरण करण्यात येणार होते. हा कार्यक्रम दुपारी तीन वाजण्याच्या आत उरकण्याची एकच लगबग जिल्हा प्रशासनाची होती. त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ सुरु होती. पालकमंत्री सामंत हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या हस्तेच वाहनांचे वाटप करण्यात येत असल्याने त्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते.
सुरुवातीला पालकमंत्री हे मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहातून मोटारीने गेटवे ऑफ इंडियाकडे प्रयाण करणार होते. तेथून ते स्पीड बोटीने अलिबाग-मांडवा येथे येणार होते. तेथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल होणार, असा त्यांचा नियोजित दौरा होता. मात्र, पालकमंत्री सामंत यांना व्यस्त कामामुळे मुंबईतून निघण्यास उशीर झाला होता. तर, दुपारी तीन वाजता आचारसंहिता जाहीर होणार होती. त्यामुळे सामंत यांनी नियोजित दौऱ्यात बदल केला. त्यांनी थेट हेलिकॉप्टरने उडत येऊन अलिबाग गाठले. हवाई मार्गाने सामंत वेळेवर पोहोचले. त्यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या अर्धा तास आधीच सरकारी कार्यक्रम आटपून घेतला आणि ते तातडीने हवाई मार्गानेच माघारीदेखील फिरले.
कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांच्यासह प्रांताधिकारी आणि तहसीलदार, अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
