श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथे पोलीस, आरोग्य विभाग व पत्रकारांनी लावला खांदा
। दांडगुरी । श्रीकांत शेलार ।
श्रीवर्धन तालुक्यात मनाला हेलावून टाकणारी घटना घडली. कोरोना पोझिटिव्ह असल्याने नातेवाईकांनी व गावातील नागरिकांनी अंत्यविधीला मदत करण्यास नकार दिल्याने प्रशासन त्या मृत व्यक्तीच्या अंत्यविधीला धावून आले.
वांजळे हनुमान वाडी येथील बाबु सोनु काते (वय 87) यांचे शुक्रवारी (दि.20) रात्री 8:30 वाजता निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर ग्रामस्थांसह नातेवाईकांनीही त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाची होणारी हेळसांड पुन्हा एकदा निदर्शनास आली.
याबाबत काही ग्रामस्थांनी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सा. पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्याकडे दूरध्वनीवरून सर्व बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर तात्काळ संदीप पोमन, पोलीस नाईक संदीप चव्हाण, सावंत, होमगार्ड, डॉ. सुरज तडवी, पत्रकार सर्फराज दर्जी यांनी घटनास्थळी भेट देत अंत्यविधी करण्याची तयारी दर्शवली. त्याठिकाणी त्यांना ग्रामस्थांची देखील मदत मिळाली असल्याचे संदीप पोमन यांनी सांगितले
मृताला खांदा देऊन पोलीस प्रशासन, आरोग्य प्रसाशन व पत्रकारांनी समाजाला माणुसकीचे दर्शनच घडवून दिले आहे. मात्र असे प्रकार वारंवार घडू नये, म्हणून प्रशासनाने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून जनजागृती करण्याची गरज आहे.